IPL 2020 KXIP vs RCB: पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्कराव्या लागणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला दुसऱ्या सामन्यात सुरूवातीला नशिबाची साथ मिळाली नाही. सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात विजय प्राप्त करणाऱ्या संघात एकही बदल न करता त्याने मैदानात उतरणं पसंत केलं. पण पंजाबकडून मात्र दोन बदल करण्यात आले. पहिल्या सामन्यात खेळलेले कृष्णप्पा गौतम आणि ख्रिस जॉर्डन यांना संघाबाहेर करत मुरूगन अश्विन आणि जिमी नीशम यांना संघात स्थान देण्यात आले. याशिवाय कर्णधार लोकेश राहुलनेदेखील दमदार असा खेळ केला.

पंजाबचा लोकेश राहुल याने पहिल्याच षटकापासून दमदार कामगिरी केली. त्याने ३६व्या चेंडूवर आपले अर्धशतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर डावाच्या १२व्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने एकेरी धाव घेतली आणि अर्धशतक पूर्ण केले. लोकेश राहुलने पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यानंतर हे त्याचे पहिले अर्धशतक ठरले. IPLमधील लोकेश राहुलचे हे १७वे अर्धशतक ठरले. त्याने विरेंद्र सेहवागला मागे टाकले. त्याने IPLमध्ये एकूण १६ अर्धशतके झळकावली होती. राहुलने १७वे अर्धशतक झळकावत जॅक कॅलीस आणि ड्वेन स्मिथ यांच्या कामगिरीशी बरोबरी केली.

IPLमध्ये २००० धावा पूर्ण

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल मैदानावर आला आणि पहिल्याच षटकात राहुलने दमदार पराक्रम केला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने त्याला पायाजवळ चेंडू टाकला. तो चेंडू त्याने मागच्या दिशेने टोलवत चौकार मिळवला. या चौकारासह त्याने IPL कारकिर्दीत २ हजार धावांचा टप्पा गाठला. IPL २००० धावा करणारा राहुल ३२वा फलंदाज ठरला. राहुलने ६९ सामने आणि ६० डावांत हा पराक्रम केला.