IPL 2020 KXIP vs RCB: अतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात केले. सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात विजय प्राप्त करणाऱ्या संघात एकही बदल न करता त्याने मैदानात उतरणं पसंत केलं. पण पंजाबकडून मात्र दोन बदल करण्यात आले. पहिल्या सामन्यात खेळलेले कृष्णप्पा गौतम आणि ख्रिस जॉर्डन यांना संघाबाहेर करत मुरूगन अश्विन आणि जिमी नीशम यांना संघात स्थान देण्यात आले.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल मैदानावर आला आणि पहिल्याच षटकात राहुलने दमदार पराक्रम केला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेश यादवने त्याला पायाजवळ चेंडू टाकला. तो चेंडू त्याने मागच्या दिशेने टोलवत चौकार मिळवला. या चौकारासह त्याने IPL कारकिर्दीत २ हजार धावांचा टप्पा गाठला. IPL २००० धावा करणारा राहुल ३२वा फलंदाज ठरला. राहुलने ६९ सामने आणि ६० डावांत हा पराक्रम केला.

ख्रिस गेल कधी खेळणार? राहुल म्हणतो…

नाणेफेकीनंतर राहुलने हे दोन बदल सांगितले. त्यावेळी समालोचक मायकल स्लेटर याने त्याला “ख्रिस गेल संघात कधी खेळणार” असा प्रश्न विचारला. या प्रश्नासाठी लोकेश राहुल कदाचित तयार नव्हता पण त्याने अडखळत का होईन उत्तर दिलं. “तो योग्य वेळी संघात येईल. गेल हा खूपच धडाकेबाज फलंदाज आहे आणि तो चेंडू जोरदार टोलवतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. IPLमध्ये दमदार विक्रम नावावर असलेल्या ख्रिस गेलसारख्या खेळाडूला संघात न खेळवण्याचा निर्णय खूप कठीण होतं. पण मला खात्री आहे की गेल योग्य वेळी संघात येईल आणि त्याची छाप सोडेल”, असं राहुल म्हणाला.