आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ आता सज्ज झाले आहेत. १९ तारखेला युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळख असलेल्या लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे. मलिंगाने माघार घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिलं आहे. मात्र मलिंगाची अनुपस्थिती नक्की जाणवेल अशी प्रतिक्रिया संघाचा कर्णधार रोहित शर्माने दिली आहे.

“मलिंगाची संघात जागा घेणं सोपं नाहीये. तो आमच्या संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. मी याआधीही अनेकदा सांगितलं आहे, की जेव्हा जेव्हा आमचा संघ संकटात असतो त्यावेळी मलिंगाने आम्हाला त्यातून बाहेर काढलं आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी त्याचं योगदान हे खूप मोठं आहे. यंदा त्याची उणीव आम्हाला नक्की भासेल.” तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीआयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

३७ वर्षीय लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्स आणि आयपीएलमधला सर्वात अनुभवी गोलंदाज मानला जातो. आयपीएलमध्ये मलिंगाच्या नावावर १७० बळी जमा आहेत. मात्र यंदा लसिथ मलिंगाच्या वडिलांवर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मलिंगाच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहवर गोलंदाजीचा भार येणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ठरलं ! मुंबई इंडियन्सकडून ‘हिटमॅन’ येणार सलामीला