पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघात जोस बटलरचे पुनरागमन झाले. डेव्हिड मिलरच्या जागी त्याला स्थान देण्यात आले. तर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या जागी अंकित राजपूतला संघात स्थान देण्यात आले. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात तडाखेबाज शतक करणारा लोकेश राहुल राजस्थानविरूद्धच्या सामन्यातदेखील त्याच लयीत दिसला. दुसरीकडे मयंक अग्रवालने तुफान फटकेबाजी करत दमदार शतक ठोकले.

मयंक अग्रवालच्या शतकामुळे यंदाच्या IPLमध्ये एका विक्रमाची पुनरावृत्ती झाली. बंगळुरूविरूद्ध राहुलने ठोकलेले शतक यंदाच्या हंगामातील पहिले शतक होते. त्यानंतर मयंकने हंगामातील दुसरे शतक ठोकले. या दमदार खेळीच्या जोरावर IPL हंगामात पहिली दोन शतकं भारतीय खेळाडूंच्या बॅटमधून निघण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २०११च्या हंगामात पंजाबकडून खेळताना पॉल वल्थाटीने पहिले शतक तर मुंबई इंडियन्सच्या सचिन तेंडुलकरने हंगामातील दुसरं शतक ठोकलं होतं.

सामन्यात मयंक अग्रवालने ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याआधी बंगळुरूविरूद्ध राहुलने शतक ठोकलं. त्याने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.