मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सदरम्यान दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या प्लेऑफच्या पहिल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवून फायन्सचे तिकीट कन्फॉर्म केले आहेत. या सामन्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी असा दोन्ही बाबतीत मुंबईचा संघ दिल्लीच्या संघापेक्षा वरचढ ठरला. मात्र या सामन्यामधून रोहितच्या फलंदाजीसंदर्भातील चिंता अधिक वाढली असल्याचे दिसत आहे. या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्याने तो एका नकोश्या विक्रमाचा मानकरी ठरला आहे.

आयपीएलच्या पहिल्याच प्लेऑफमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय गेतला. मुंबई इंडियन्सकडून सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक मैदानात उतरले. दिल्लीच्या संघाकडून गोलंदाजीमध्ये डॅनियल सैम्सने आक्रामक सुरुवात केली. या सामन्यामध्ये रोहित शर्मा पहिलाच चेंडू खेळताना बाद झाला. सामन्यातील दुसरेच षटक रविचंद्रन अश्विनने टाकले. रोहितसाठी सामन्यातील नववा चेंडू हा पहिलाच चेंडू होता. अश्विनच्या षटकातील याच चेंडूवर रोहित एलबीडब्ल्यू झाला. अशाप्रकारे रोहित गोल्डन डकवर बाद होण्याची ही १३ वी वेळ आहे. दिल्लीविरोधात शून्यावर बाद झाल्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहितचा समावेश झाला आहे. रोहितबरोबरच या यादीमध्ये हरभजन सिंह आणि पार्थिव पटेल या दोघांच्या नावेही प्रत्येकी १३ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे.

प्लेऑफ आणि नॉक आऊटमध्ये वाईट कामगिरीची परंपरा

प्लेऑफमध्ये येऊन रोहितला साजेशी कामगिरी करता येत नाही हे यावेळीही दिसून आलं. आतापर्यंत रोहितने आयपीएलमध्ये प्लेऑफ किंवा नॉक आऊट स्तरावरील १९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये रोहितने १२.७२ च्या सरासरीने १०१.३२ च्या धावगतीने २२९ धावा केल्यात यापैकी तीन वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.

रोहितला आयपीएलमध्ये गोल्डन डकवर बाद करणारे गोलंदाज

उमेश यादव
जोफ्रा आर्चर<br />रविचंद्रन अश्विन</p>

दुखापत अन् पुन्हा संघात

यंदाच्या हंगामामध्ये दुखापतीमुळे रोहित काही सामने बाहेर बसला होता. मात्र त्याला नक्की काय दुखापत झाली आहे यासंदर्भात स्पष्टपणे कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. साखळी फेरीतील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित पुन्हा संघात शामिल झाला. मात्र त्या सामन्याही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातूनही रोहितला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मात्र रोहितला नक्की का वगळलं, त्याला काय दुखापत झाली होती याबद्दलची उत्तर अद्यापही गुलदस्त्यामध्येच आहेत.