पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघासमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. RCB विरुद्ध सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मार्शला गोलंदाजीची संधी दिली. सामन्यातलं पाचवं षटक टाकत असताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतू यात त्याला अपयश आलं. अखेरीस विजय शंकरने मार्शचं उरलेलं षटक पूर्ण केलं.

अवश्य वाचा – Video : दुहेरी धाव घेताना हैदराबादच्या खेळाडूंची मैदानात टक्कर, विकेटही गमावली

फलंदाजीदरम्यानही मार्श दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. ज्यामुळे त्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचं बोललं जातंय. “मार्शला झालेली दुखापत ही गंभीर वाटत आहे. तो यापुढील सामन्यांमध्ये खेळू शकेल याची खात्री वाटत नाही.” हैदराबाद संघातील एका सूत्राने पीटीआयला माहिती दिली. मार्श स्पर्धेला मुकल्यास हैदराबाद संघासाठी तो मोठा धक्का मानला जाऊ शकतो. यामुळे हैदराबाद मार्शच्या जागेवर डॅनिअल ख्रिश्चन किंवा मोहम्मद नबीला संघात स्थान देऊ शकतं.

अवश्य वाचा – IPL 2020 : व्वा, काय 3D परफॉर्मन्स आहे ! विजय शंकर सोशल मीडियावर ट्रोल