आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी रोहित शर्माने मैदानावर पाऊल ठेवताच चेन्नईचा कर्णधार एम.एस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

आरसीबीविरोधात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्माने धोनीची बरोबरी केली आहे. धोनी आणि विराट कोहलीने आरसीबी संघाविरोधात प्रत्येकी २७ -२७ सामने खेळले आहेत. बंगळुरुविरोधात सर्वाधिक सामने मिस्टर आयपीएल सुरैश रैनाने खेळले आहे. रैनाने बंगळुरुविरोधात २८ सामने खेळले आहेत. त्यानंतर रोहित आणि धोनीचा क्रमांक लागतो. चेन्नईच्या जाडेजाने बंगळुरुविरोधात २४ सामने खेळले आहेत.

दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामात एक विजय आणि एक पराभव अशी संमिश्र सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर आज मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. जलदगती गोलंदाजांची खराब कामगिरी हा विराट कोहलीच्या संघासमोर सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. हैदराबादला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर बंगळुरुला पंजाबकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. जलदगती गोलंदाजांसोबत कर्णधार विराट कोहलीसमोर स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्याचं आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौरभ तिवारीच्या जागी मुंबई इंडियन्सने इशान किशनला संघात स्थान दिलं आहे.