चेन्नईविरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने २० षटकात १७८ धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुलचं धडाकेबाज अर्धशतक आणि निकोलस पूरनची तडाखेबंद फटकेबाजी याच्या जोरावर पंजाब दोनशेपार सहज मजल मारेल अशी अपेक्षा होती. पण शेवटच्या काही षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत पंजाबच्या धावगतीवर अंकुश लावला. सलग दोन चेंडूवर राहुल आणि पूरनला बाद करणाऱ्या शार्दूल ठाकूर सर्वाधिक दोन गडी बाद केले.

सामन्यात कर्णधार राहुलचा झेल धोनीने घेतला. शार्दूल ठाकूरने टाकलेल्या चेंडूवर राहुलने फटका मारला पण चेंडू बॅटच्या कडेला लागून धोनीकडे गेला. त्यामुळे राहुल झेलबाद झाला. या कॅचसोबतच धोनीने विकेटकिपरची भूमिका पार पाडताना IPLच्या इतिहासात १००वा झेल टिपला. IPL इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा विकेटकिपर दिनेश कार्तिक आहे. त्याने धोनीच्या आधीच कॅचचे शतक पूर्ण केलं आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालला चांगली सुरूवात मिळाली पण तो २६ धावांवर तो बाद झाला. आज संधी मिळालेला मनदीप सिंगदेखील चांगल्या सुरूवातीनंतर २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी ५८ धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब २००पार पोहोचणार असं वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात परत आणलं. ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही.