चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची IPL 2020मधील गुणतालिकेतील स्थिती फारशी वेगळी नाही. दोन्ही संघ केवळ ३ विजयांसह ६ गुण कमावून सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे बाद फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यकच आहे. सध्या तरी चेन्नई आणि राजस्थान या संघांना अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आलेले आहे. राजस्थानच्या संघाने सुरूवात खूप चांगली केली होती, पण दोन-सामन्यांनंतर त्यांची गाडी रूळावरून घसरली. चेन्नईच्या संघाच्या कामगिरीतही फारसा फरक नाही. पण या सामन्यात CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीने रचलेला इतिहास…

या सामन्यात नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. या आधी कोणत्याही खेळाडूला हा पराक्रम करणं शक्य झालं नव्हतं. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १९७ सामन्यांसह मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर १९३ सामन्यांसह सुरेश रैना आहे.

सध्या सातव्या आणि आठव्या क्रमांकांवर असलेल्या दोन्ही संघांना बाद फेरीची वाट खडतर आहे. त्यातच अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे काही दिवस खेळू शकणार नसल्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडली आहे. धोनीच्या नेतृत्वक्षमतेच्या बळावर CSKने सनरायजर्स हैदराबादला नमवल्यानंतर चेन्नईची गाडी रुळावर येईल अशी अपेक्षा होती. परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीविरुद्ध त्यांना बसला. राजस्थानलाही रंगतदार सामन्यांत दडपण हाताळणे कठीण जाताना दिसते आहे.