युएईच्या मैदानांवर सध्या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय IPL 2020 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंपासून ते अगदी १८-१९ वर्षांचे तरूण खेळाडू आहेत. रणजी क्रिकेट आणि इतर स्थानिक क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीच्या जोरावर अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कोलकाताच्या संघात शुबमन गिल, कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीसारखे नवोदित खेळाडू आहेत. हैदराबादच्या संघाकडे १८ वर्षीय अब्दुल समाद आहे. तर राजस्थानच्या संघाचा मुंबईचा नवखा यशस्वी जैस्वाल आहे. कोलकाता आणि हैदराबादच्या संघांनी आणि त्यांच्या नवोदित खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे, पण राजस्थानच्या यशस्वी जैस्वालला अजून दमदार प्रदर्शन करता आलेलं नाही. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात येत असून समालोचक आकाश चोप्राने त्याची पाठराखण केली आहे.

अतिशय समतोल मानला जाणारा चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात काहीसा वाट चुकल्यासारखा खेळतो आहे. महेंद्रसिंग धोनी त्याच्या संथ खेळीमुळे अजूनही टीकेचा धनी ठरतोय. याशिवाय केदार जाधवनेही कोलकाताविरूद्ध केलेल्या कामगिरीमुळे त्याला भयानक ट्रोल केलं जात आहे. असं असतानाच मुंबईकर यशस्वी जैस्वाललाही त्यांच्या पंगतीत उभं करण्याचा प्रयत्न एका सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून करण्यात आला. धोनी आणि केदार दोघे आपला संथ खेळीचा वसा यशस्वी जैस्वालकडे सुपूर्द करत असल्याचं या पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे. टूक टूक अकादमीमध्ये आता यशस्वी जैस्वालही सामील झाला आहे, असं ट्विट फोटोसोबत करण्यात आलं आहे. नव्या दमाच्या यशस्वी जैस्वालला ट्रोल केलेलं समालोचक आकाश चोप्राला अजिबात पटलेलं नाही. त्याने ट्विट करून या पोस्टचा समाचार घेतला.

यशस्वी जैस्वालला राजस्थानच्या संघाने २०२०च्या लिलावात २ कोटी ४० लाखांच्या किमतीला विकत घेतलं. आतापर्यंत त्याला राजस्थानकडून ३ सामने खेळायला मिळाले असून त्यात त्याने एकूण ४० धावा केल्या आहेत. ३४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.