राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत आवश्यक क्षणी फटकेबाजी करण्याऐवजी रंगत संपल्यानंतर मनोरंजक षटकार खेचणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर प्रचंड टीका झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्याबद्दल धोनीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही तोफ डागली. त्यामुळे IPL 2020मध्ये शुक्रवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी नक्की कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. त्याचसोबत धोनीला या सामन्यात एक विक्रम खुणावतो आहे.

धोनीने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात तीन उत्तुंग षटकार लगावले. आता दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धोनीला एक विक्रम करण्याची संधी आहे. टी२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर धोनी उभा आहे. राजस्थानविरूद्ध लगावलेल्या षटकारांमुळे सध्या धोनीच्या नावावर २९८ टी२० षटकार आहेत. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात २ षटकार लगावताच ३०० षटकारांचा टप्पा धोनी पार करेल. टी२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा पार करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनण्याची धोनीकडे संधी आहे. या यादीत रोहित शर्मा (३६१) अव्वल आणि सुरेश रैना (३११) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

फलंदाजीचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या शारजा येथील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाला प्रामुख्याने चेन्नईचा फिरकी मारा जबाबदार ठरला. यात २०वे षटक तर चेन्नईसाठी अत्यंत महागडे ठरले होते. त्यानंतर फलंदाजांना विशेषत: मुरली विजय, केदार जाधव आणि धोनी यांना आपली भूमिका चोख बजावता आली नाही. सॅम करन आणि ऋतुराज गायकवाड यांना फलंदाजीत आधी पाठवून धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. तो निर्णय चुकीचा ठरला, पण तरीही फाफ डू प्लेसिसने कमी चेंडूंत अधिक धावांचे आव्हान पेलण्यासाठी हिमतीने लढा दिला. मात्र फटकेबाजीची क्षमता असलेल्या धोनीने आपला फलंदाजीचा पवित्रा बदलला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनी कसा खेळतो हे पाहण्यास सारेच उत्सुक असतील.