IPLच्या गेल्या १२ हंगामात अतिशय समतोल असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदाच्या हंगामात धक्कादायकरित्या पराभवांना सामोरं जावं लागत आहे. सलामीच्या सामन्यात मुंबईवर विजय मिळवल्यानंतर एकूण ९ सामन्यांत ६ पराभव चेन्नईच्या पदरी पडले. CSKच्या खेळाडूंमध्ये असलेला सातत्याचा अभाव आणि काही मोक्याच्या क्षणी गमावलेले सामने यामुळे ‘धोनी आणि कंपनी’वर टीका करण्यात आली. चेन्नईच्या संघाला सुरेश रैनाच्या अनुपस्थितीचा चांगलाच फटका बसला. अनेकदा ट्विटरवर #ComeBackRaina हा हॅशटॅग ट्रेंड होतानाही दिसला. याचदरम्यान, राजस्थान विरूद्ध चेन्नई सामन्याआधी सुरेश रैनाने धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केल्याने रैनाचे ट्विट चर्चेत आले.

राजस्थान विरूद्धच्या सामन्याआधी नाणेफेकीसाठी आलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर रैनाने धोनीसोबतचा फोटो पोस्ट करत महत्त्वाचं ट्विट केलं. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. हेच औचित्य साधून रैनाने फोटो पोस्ट केला. “IPL स्पर्धेत २०० सामने खेळणारा पहिलावहिला खेळाडू… महेंद्रसिंग धोनी. आजच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा. भाई, असाच यशस्वी होत राहा. तुझा आम्हाला कायम अभिमान असेल”, असं ट्विट रैनाने केलं.

IPL स्पर्धेत या आधी कोणत्याही खेळाडूला २०० सामन्यात प्रतिनिधित्व करणं शक्य झालं नव्हतं. महेंद्रसिंग धोनी २०० IPL सामना खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १९७ सामन्यांसह मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर १९३ सामन्यांसह सुरेश रैना आहे.