वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्सचा भेदक मारा यांच्या जोरावर कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी मात केली. या विजयासह कोलकाताने प्ले-ऑफ्सच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं. नितीश राणा आणि सुनील नारायण यांच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकाताने दिल्लीला १९५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १३५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

अजिंक्य रहाणेने या सामन्यात मैदानावर उतरताच चाहत्यांना अभिमान वाटावा असा एक पराक्रम केला. कोलकाताविरूद्ध त्याने खेळलेला सामना हा त्याचा टी२० कारकिर्दीतील २००वा सामना ठरला. IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशा दोन्ही प्रकारात मिळून अजिंक्यने हा महत्त्वाचा टप्पा गाठला. २०० टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान पटकावले. अजिंक्यने IPLमध्ये १४४ सामने तर टीम इंडियासाठी ५६ सामने खेळले आहेत.

अजिंक्यसाठी हा सामना खास होता पण त्याला सामन्यात मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. विजयासाठी मोठं आव्हान मिळालेल्या दिल्लीने सलामीसाठी अजिंक्य रहाणेला पाठवलं. दुर्दैवाने स्विंग होणाऱ्या चेंडूवर अजिंक्य शून्यावर माघारी परतला. पॅट कमिन्सने डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केलं.