मुंबईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाला २० षटकांत केवळ ११४ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यावर सॅम करनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन संघाला कशीबशी शंभरी गाठून दिली. ११५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने डी कॉकसोबत सलामीला इशान किशनला संधी दिली.

पायाच्या दुखापतीमुळे नियमित कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी संघात सौरभ तिवारीला स्थान मिळाले, पण सलामीवीर डी कॉकसोबत इशान किशनला संधी मिळाली. मुंबईकडून IPL इतिहासात पहिल्यांदाच दोन डावखुऱ्या फलंदाजांनी सलामी केली. याआधी किमान एक सलामीवीर हा उजव्या हाताचा होता, पण आज प्रथमच मुंबईच्या बाबतीत असं घडलं.

दरम्यान, नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (०), अंबाती रायडू (२), जगदीशन (०), फाफ डु प्लेसिस (१) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (७) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनी संयमी खेळत असतानाच राहुल चहरने धोनीला (१६) झेलबाद करवले. नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.