Dream11 IPL 2020 UAE MI vs CSK: चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

चेन्नई सुपर किंग्ज आजपर्यंत दोन वेळा १० गडी राखून विजय मिळवला होता, पण चेन्नईच्या गोलंदाजांना डावात एकही गडी बाद करता आला नाही अशी गोष्ट प्रथमच घडली. १० गड्यांनी पराभव होण्याची ही चेन्नईच्या संघाची संपूर्ण IPL कारकिर्दीतील पहिली वेळ ठरली. मुंबईच्या सलामी जोडीनेच चेन्नईच्या अपेक्षांचा चक्काचूर केला. याचसोबत चेन्नईच्या प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याच्या आशांनाही सुरूंग लागला. IPLच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे मुंबईविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईला दुहेरी दणका बसला.

असा रंगला सामना…

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (०), अंबाती रायडू (२), जगदीशन (०), फाफ डु प्लेसिस (१) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (७) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनीही स्वस्तात (१६) बाद झाला. पण नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ४ गडी टिपले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि क्विंटन डी कॉक जोडीनेच मुंबईला विजय मिळवून दिला. इशान किशनने नाबाद ६८ तर क्विंटन डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या.