क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने रविवारच्या सामन्यात दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. त्याच्या जोरावर दिल्लीने २० षटकात १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने फटकेबाजी आणि संयमी खेळीचे मिश्रण करून शानदार विजय मिळवला. अर्धशतकवीर क्विंटन डी कॉकला सामनावीर घोषित करण्यात आले, पण संघाचे फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी मात्र दुसऱ्या खेळाडूची स्तुती केली.

“युएईच्या मैदानावर आव्हानाचा पाठलाग करणं सोपं नाही. लक्ष्याचा पाठलाग आम्ही उत्तमप्रकारे केला. आम्ही जशी योजना आखली होती, त्याप्रकारे आम्ही खेळ केला. त्याचा आम्हाला फायदा झाला. यात महत्वाची भूमिका गोलंदाजांनी बजावली. त्यातही विशेषत: कृणाल पांड्याची कामगिरी दमदार झाली. त्याच्या ४ षटकांनी मुंबईला खूप फायदा झाला. मोक्याच्या क्षणी त्याने मिळवून दिलेल्या बळींमुळे सामन्यात रंगत आली आणि मुंबईला त्याचा फायदा झाला”, अशा शब्दांत रॉबिन सिंगने त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली. कृणालने सामन्यात ४ षटकांत २६ धावा देत २ बळी टिपले.

दिल्लीवर भारी पडले मुंबईकर…

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणे १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्यामुळे दिल्लीने १६२ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली. सलामीवीर क्विंटन डी कॉकने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत ३६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी करत ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यानंतर सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला असताना कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मोक्याच्या क्षणी धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.