‘सुपर ओव्हर’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या निर्णयांवर टीका झाली. ‘सुपर ओव्हर’मध्ये लयीत असणाऱ्या इशान किशनला न पाठवल्याबद्दल समाजमाध्यमांवर मुंबईला धारेवर धरले आहे. मात्र इशान थकल्याने त्याला पाठवण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिले आहे.

‘‘इशान किशन हा ९९ धावांवर बाद होऊन परतला, तेव्हा खूप थकलेला होता. परंतु ‘सुपर ओव्हर’मध्ये फटकेबाजी करण्यासाठी ताजेतवाने फलंदाज गरजेचे होते. याआधी हार्दिक पंडय़ा आणि पोलार्ड यांनी ‘सुपर ओव्हर’मधील विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळेच त्या दोघांना पाठवण्यात आले. १२ धावा झाल्या असत्या तरी वेगळा निकाल पाहायला मिळाला असता,’’ असे जयवर्धने यांनी स्पष्टीकरण दिले.