‘आयपीएल’मध्ये रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या निर्णयावर किंग्ज इलेव्हन पंजाबचे खेळाडू, व्यवस्थापक आणि चाहत्यांनी कडाडून टीका केली आहे. पंजाबच्या फलंदाजाने एक धाव अपूर्ण काढल्याचा निर्णय मेनन यांनी दिला होता. या निर्णयामुळे ‘सुपर ओव्हर’पर्यंत रंगलेल्या लढतीत पंजाबला पराभव पत्करावा लागला.

कॅगिसो रबाडाने टाकलेल्या १९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंजाबच्या ख्रिस जॉर्डनने दोन धावा घेतल्या. मात्र त्यापैकी एक धाव अपूर्ण असल्याचा ेकौल मेनन दिला; पण पुनर्आढाव्यात जॉर्डनच्या बॅटचा क्रीझच्या आत किंचित स्पर्श झाल्याचे दिसत होते.

‘‘पंचांच्या निर्णयाविरोधात आम्ही सामनाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. किमान तिसऱ्या पंचांनी यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते. ‘आयपीएल’मध्ये तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करायला हवा,’’ असे पंजाब संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी सांगितले.

याबाबत पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटाने ‘ट्विटर’च्या माध्यमातून टीका केली आहे. सामनावीर पुरस्कार मार्कस स्टॉइनिसऐवजी पंचांना द्यायला हवा होता, असा टोला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लगावला. मात्र काही माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी पंचांवर टीका करण्याऐवजी पराभव स्वीकारावा अशा सूचना दिल्या.