भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता युएईत आयोजित करण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही कालावधी शिल्लक राहिलेले आहेत. सर्व संघ आणि खेळाडू गेला महिनाभर युएईत कसून सराव करत आहेत. करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने Bio Security Bubble तयार केलं आहे. बाहेरील देशांमधून युएईत येणाऱ्या खेळाडूंना किमान ६ ते १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागणार होता. परंतू याआधीच Bio Secure Bubble मध्ये खेळणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना या क्वारंटाइन कालावधीमधून सूट द्यावी अशी मागणी होत होती. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पहिल्या सामन्यात सहभागी होता यावं यासाठी संघमालक क्वारंटाइन कालावधी कमी केला जावा यासाठी आग्रही होते.

ही मागणी मान्य करत बीसीसीआयने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी कमी करुन आता ३६ तासांचा केला आहे. परंतू अबु धाबीमध्ये स्थित असलेल्या संघांना आपल्या खेळाडूंसाठी ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधीच ठेवण्यात आलाय. इयॉन मॉर्गन, पॅट कमिन्स आणि टॉम बँटन या कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंना अबु धाबीत सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागणार असल्याची माहिती संघाच्या सीईओंनी दिली. दुबईत स्थित असलेल्या संघांना मात्र बीसीसीआयच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह आली तर त्यांना १९ तारखेला सकाळपर्यंत क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात जोश हेजलवूड आणि सॅम करन हे दोन ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडू आहेत. दिल्लीच्या संघात स्टॉयनिस, कॅरी आणि डॅनिअल सम्स या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन हे खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. याचसोबत इतर संघातही इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना संधी देता येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.