IPL २०२० स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. चेन्नईचा संघ वगळता सर्व संघ क्वारंटाइन कालावधी संपवून सराव सत्रात दाखल झाले आहेत. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्याने चेन्नईचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले. पण इतर संघातील खेळाडू मात्र तब्बल पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरले. त्यापैकी यंदा दिल्लीकडून खेळणारा फिरकीपटू आर अश्विन याने क्वारंटाइन काळातील आपला अनुभव सांगितला.

सर्व संघ ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात युएईमध्ये दाखल झाले. त्यानंतर साऱ्यांना सहा दिवसांच्या क्वारंटाइनची सक्ती होती. त्याबाबत बोलताना अश्विन म्हणाला, “गेले पाच-सहा महिने मी घरी होतो. पण माझ्यासोबत माझे कुटुंबीय होते. मी यू ट्युब चॅनलवर माझं काम करायचो. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून स्वत:ला व्यस्त ठेवायचो. पण युएईमध्ये आल्यानंतरचे क्वारंटाइनचे ते सहा दिवस अंगावर काटा आणणारे होते.”

“पहिला दिवस चांगला गेला. माझ्या रूममधून बाहेर पाहिलं की मला दुबई तलाव दिसत होता. उजव्या बाजूला पाहिलं की बुर्ज खलिफा दिसायचं. पण त्याकडे तरी किती वेळ पाहत राहणार? किती वेळ माणूस बाल्कनीत बसणार आणि बाहेर बघत राहणार? आणि त्यात तिथलं वातावरण अत्यंत उष्ण होतं”, असंही त्याने नमूद केलं.

“सहसा मी फारसा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये घुसून बसून राहत नाही. फार काळ मला या गोष्टी वापरायला आवडत नाही. त्यासाठी मी दिवसातले जास्तीत जास्त २ ते अडीच तास ठेवले आहेत. पण क्वारंटाइनमुळे माझा मोबाईल वापराचा कालावधी चक्क सहा तासांचा होता हे पाहून मलाच धक्का बसला”, असेही त्याने सांगितले.