भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदा आयपीएलचं आयोजन युएईत केलं. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व संघ यासाठी कसून सराव करत आहेत. परदेशी खेळाडूही एक-एक करुन युएईत दाखल झाले आहेत. परंतू राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करणारा बेन स्टोक्स अद्याप युएईत दाखल झालेला नाही. स्टोक्सच्या वडिलांवर सध्या न्यूझीलंडमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. त्यामुळे आपल्या परिवारासोबत राहण्यासाठी स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध दौऱ्यातूनही माघार घेतली. त्यामुळे तो आयपीएलमध्येही खेळणार की नाही याबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

“स्टोक्ससाठी सध्याचा काळ खडतर आहे, आम्ही सर्वजण त्याच्या सोबत आहोत. त्याला सध्या परिवारासोबत राहण्याची गरज आहे आणि तो वेळ आम्ही त्याला देत आहोत. त्यामुळे स्टोक्स यंदा खेळणार आहे की नाही याबद्दल नेमकी माहिती आमच्याकडे नाही. परंतू येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारल्यास आम्ही काहीतरी अंतिम निर्णय घेऊ. पण त्याआधीच भविष्यात काय होईल यावर मला आता भाष्य करायचं नाही.” राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड यांनी ESPNCricinfo शी बोलताना माहिती दिली.

स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली यंदा राजस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा अपवाद वगळता आतापर्यंत विजेतेपदाने राजस्थानला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.