दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवत गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले.

राशिद खानने हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात तब्बल १७ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि त्या बदल्यात ३ बळी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या सातही धावा या एकेरी धाव काढून मिळवलेल्या होत्या. कोणत्याही फलंदाजाला त्याने चेंडू सीमापार मारू दिला नाही. IPL कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

फिरकीपटू हरभजन सिंगदेखील त्याच्या गोलंदाजीवर फिदा झाला. त्याने ट्विट करून राशिदचं कौतुक केलं. “व्वा लाला. तू अप्रतिम गोलंदाजी केलीस. तू तर चॅम्पियन गोलंदाज आहेस”, असं म्हणत हरभजनने त्याचं कौतुक केलं.

असा रंगला सामना…

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा जोडीने तुफान फटकेबाजी करत शतकी सलामी दिली. वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावा केल्या. तर आज संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाने ४५ चेंडूत ८७ धावा कुटल्या. या दोघांनंतर मनिष पांडेने नाबाद ४४ धावांची खेळी करत संघाला २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

२२० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. शिखर धवन (०) आणि मार्कस स्टॉयनीस (५) स्वस्तात बाद झाले. शिमरॉन हेटमायर-अजिंक्य रहाणे जोडीने थोडी फटकेबाजी केली, पण रहाणे २६ तर हेटमायर १६ धावांवर तंबूत परतला. कर्णधार श्रेयस अय्यर (७), अक्षर पटेल (१) आणि कगिसो रबाडाही (३) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ संघर्ष केला, पण त्याला ३६ धावा काढून माघारी परतावे लागले.त्यामुळे दिल्लीचा डाव १३१ धावांवर आटोपला.