दरवर्षी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) क्रिकेटमय हंगाम बहरतो. मात्र यंदा करोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान मनोरंजनाच्या पर्वणीचा १३वा अध्याय रंगणार आहे. यंदा अनेक खेळाडूंनी विविध कारणांस्तव स्पर्धेतून माघार घेतली असली तरी ‘आयपीएल’ क्रिकेटरसिकांच्या मनावर राज्य करेल, अशी क्रीडा क्षेत्राला आशा आहे. याच पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे प्रेक्षकांविना खेळल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’मधील आठही संघांच्या सामर्थ्यांचा घेतलेला हा आढावा..

मुंबई इंडियन्स

विजेतेपद : २०१३, २०१५, २०१७, २०१९

कर्णधार : रोहित शर्मा

मुख्य आकर्षण : ट्रेंट बोल्ट

‘आयपीएल’मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सची ख्याती आहे. अमिरातीतील खेळपट्टय़ांवर तुफानी फटकेबाजी करण्यासाठी यंदा मुंबईने ख्रिस लीनसारख्या स्फोटक फलंदाजाला संघात स्थान दिले आहे. याशिवाय लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या साथीने प्रथमच मुंबईच्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा ट्रेंट बोल्ट काय कमाल करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली ट्रीनबॅगो नाइट रायडर्सने नुकतेच कॅरेबियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले. त्यामुळे तोसुद्धा या वेळी वेगळ्याच आवेशात खेळताना दिसेल. एकूणच चार वेळच्या विजेत्या मुंबईला यंदा जेतेपदाचे पंचक साकारण्याची सुवर्णसंधी आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

विजेतेपद : २०१०, २०११, २०१८

कर्णधार : महेंद्रसिंह धोनी

मुख्य आकर्षण : दीपक चहर

‘आयपीएल’ ही अशी स्पर्धा आहे, जेथे अन्य सात संघ अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळण्यासाठी आपापसात झुंजतात, असे एक अलिखित समीकरण मानले जाते. आतापर्यंतच्या १२ हंगामांपैकी सर्वाधिक आठ वेळा अंतिम फेरी गाठत चेन्नईने ते सिद्धही केले आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमी त्याला ‘आयपीएल’मध्ये खेळताना पाहण्यासाठी आतुर आहेत. सुरेश रैना, हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे संघाला काहीसा धक्का बसला तरी अनेक प्रतिभावान खेळाडू त्यांच्या संघात आहेत. करोनावर मात करणारा ‘आयपीएल’मधील पहिला खेळाडू दीपक चहर चेन्नईच्या वेगवान माऱ्याचे पुन्हा एकदा समर्थपणे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

दिल्ली कॅपिटल्स

सर्वोत्तम कामगिरी : बाद फेरी (२००८, २०१२, २०१९)

कर्णधार : श्रेयस अय्यर

मुख्य आकर्षण : अजिंक्य रहाणे</p>

रिकी पाँटिंग, प्रवीण तांबे, मोहम्मद कैफ आणि रायन हॅरिस यांसारख्या मातब्बर प्रशिक्षकांची फौज उपलब्ध असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला गतवर्षी पहिल्यावहिल्या अंतिम फेरीने थोडक्यात हुलकावणी दिली. भारताच्या भविष्यातील ताऱ्यांपैकी कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ हे खेळाडू दिल्लीकडे आहेत; परंतु भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेला अजिंक्य रहाणे यंदा संधीचा लाभ घेण्यास उत्सुक असेल. जेसन रॉयच्या माघारीनंतरही दिल्लीकडे शिम्रॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी, मार्कस स्टोयनिस असे विदेशी खेळाडू उपलब्ध आहेत, तर रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांच्यावर दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा असेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

उपविजेतेपद : २००९, २०११, २०१६

कर्णधार : विराट कोहली

मुख्य आकर्षण : जोशुआ फिलिपे

विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, आरोन फिंच, मोईन अली यांसारख्या मातब्बर फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ फिलिपेला संघात स्थान दिले आहे. बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या फिलिपेच्या आगमनाने बेंगळूरु पहिल्यांदाच ‘आयपीएल’ जिंकणार का, हे पाहणे रंजक ठरेल; परंतु गोलंदाजी हा नेहमीच त्यांचा कळीचा मुद्दा राहिला आहे. डेल स्टेन, यजुर्वेद्र चहल आणि अ‍ॅडम झम्पा यांनी या वेळी संघाला गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकवून देण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. मात्र त्यांना उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या भारतीय वेगवान गोलंदाजांचीही तितकीच साथ लाभणे गरजेचे आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब

उपविजेतेपद : २०१४

कर्णधार : के. एल. राहुल

मुख्य आकर्षण : शेल्डन कॉट्रेल

‘आयपीएल’च्या आठ संघांपैकी अनिल कुंबळेच्या रूपात एकमेव भारतीय मुख्य प्रशिक्षक असणारा संघ म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाब. के. एल. राहुलकडे यंदा प्रथमच पंजाबचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. फलंदाजाला बाद केल्यानंतर अनोख्या शैलीत जल्लोष करणारा शेल्डन कॉट्रेल अमिरातीतील खेळपट्टय़ांवर मोहम्मद शमीच्या साथीने कमाल करू शकतो. मुजीब ऊर रहमान, रवी बिश्नोई ही किशोरवयीन फिरकी जोडी विरोधी संघांसाठी धोकादायक ठरू शकते. फलंदाजीत ख्रिस गेल, निकोलस पूरन, मयांक अगरवाल असे कौशल्यवान फलंदाज पंजाबकडे आहेत. त्यामुळे अमिरातीतच २०१४ मध्ये झालेल्या ‘आयपीएल’प्रमाणे यंदाही पंजाबने अंतिम फेरी गाठल्यास आश्चर्य वाटायला नको.

सनरायजर्स हैदराबाद

विजेतेपद : २००९, २०१६

कर्णधार : डेव्हिड वॉर्नर

मुख्य आकर्षण : प्रियम गर्ग

‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारा एकमेव फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर. यंदा वॉर्नरकडे पुन्हा एकदा हैदराबादचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गतवर्षी जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही हैदराबादला बाद फे रीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यंदाही संघाने जवळपास त्याच खेळाडूंवर पुन्हा विश्वास दर्शवला असून भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीवर हैदराबादची प्रामुख्याने भिस्त असेल. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियम गर्गच्या ‘आयपीएल’ पदार्पणावर सगळ्यांच्या नजरा आहेत.

राजस्थान रॉयल्स

विजेतेपद : २००८

कर्णधार : स्टीव्ह स्मिथ

मुख्य आकर्षण : यशस्वी जैस्वाल

नवख्या आणि अननुभवी खेळाडूंसह खेळूनही ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवता येते, हे शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये सिद्ध केले; परंतु त्यानंतर गेली ११ वर्षे या संघाची गाडी रुळावरून घसरलेलीच पाहायला मिळाली. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील या संघात बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर सारख्या रथी-महारथींचा समावेश आहे; परंतु २०२०च्या युवा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणारा यशस्वी जैस्वाल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे श्रेयस गोपाळ,कृष्णप्पा गौतम, संजू सॅम्सन हे खेळाडूसुद्धा या संघाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे यंदा तरी राजस्थानने बाद फेरीचा अडथळा ओलांडावा, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

विजेतेपद : २०१२, २०१४

कर्णधार : दिनेश कार्तिक

मुख्य आकर्षण : पॅट कमिन्स

‘आयपीएल’च्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या पॅट कमिन्सवर कोलकाता नाइट रायडर्सच्या प्रत्येक चाहत्याचे बारीक लक्ष असेल. त्याशिवाय यंदा कोलकाताने इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला सहभागी करून फलंदाजी अधिक बळकट केली आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे पालटणारा आंद्रे रसेल कोलकाताकडे असून सुनील नरिनही दोन्ही आघाडय़ांवर कोलकाताला सावरत आहे. शुभमन गिल, नितीश राणा, टॉम बॅन्टन या नव्या दमाच्या खेळाडूंना कोलकाता अधिक संधी देण्याची चिन्हे आहेत. ट्रीनबॅगो नाइट रायडर्सचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलम कोलकातालाही यंदा जेतेपदाची दिशा दाखवणार का, याचे उत्तर १० नोव्हेंबपर्यंत सर्वाना मिळालेले असेल.

‘आयपीएल’चे वेळापत्रक

तारीख                                सामना                                                वेळ

१९ सप्टेंबर   मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज                      सायं. ७.३०

२० सप्टेंबर   दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब               सायं. ७.३०

२१ सप्टेंबर   सनरायजर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु         सायं ७.३०

२२ सप्टेंबर   राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज                 सायं. ७.३०

२३ सप्टेंबर   कोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स               सायं. ७.३०

२४ सप्टेंबर   किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु        सायं. ७.३०

२५ सप्टेंबर   चेन्नई सुपर किंग्ज वि. दिल्ली कॅपिटल्स                   सायं. ७.३०

२६ सप्टेंबर   कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद       सायं. ७.३०

२७ सप्टेंबर   राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब                  सायं. ७.३०

२८ सप्टेंबर   रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्स                     सायं. ७.३०

२९ सप्टेंबर   दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद                   सायं. ७.३०

३० सप्टेंबर   राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स            सायं. ७.३०

१ ऑक्टोबर   किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स                    सायं. ७.३०

२ ऑक्टोबर   चेन्नई सुपर किंग्ज वि. सनरायजर्स हैदराबाद               सायं. ७.३०

३ ऑक्टोबर   रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. राजस्थान रॉयल्स               दु. ३.३०

दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स                       सायं. ७.३०

४ ऑक्टोबर   मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद                   दु. ३.३०

किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्ज                      सायं. ७.३०

५ ऑक्टोबर   रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. दिल्ली कॅपिटल्स             सायं. ७.३०

६ ऑक्टोबर   मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स                      सायं. ७.३०

७ ऑक्टोबर   कोलकाता नाइट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज   सायं. ७.३०

८ ऑक्टोबर   सनरायजर्स हैदराबाद वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब    सायं. ७.३०

९ ऑक्टोबर   राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स                    सायं. ७.३०

१० ऑक्टोबर  किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइट रायडर्स  दु. ३.३०

चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु                 सायं. ७.३०

११ ऑक्टोबर  सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स             दु. ३.३०

मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स                                   सायं. ७.३०

१२ ऑक्टोबर  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. कोलकाता नाइट रायडर्स    सायं. ७.३०

१३ ऑक्टोबर  सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज            सायं. ७.३०

१४ ऑक्टोबर  दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स                         सायं. ७.३०

१५ ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज ईलेव्हन पंजाब       सायं. ७.३०

१६ ऑक्टोबर  मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स              सायं. ७.३०

१७ ऑक्टोबर  राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु              दु. ३.३०

दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज                             सायं. ७.३०

१८ ऑक्टोबर  सनरायजर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स      दु. ३.३०

मुंबई इंडियन्स वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब                            सायं. ७.३०

१९ ऑक्टोबर  चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स                   सायं. ७.३०

२० ऑक्टोबर  किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स                सायं. ७.३०

२१ ऑक्टोबर कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु   सायं. ७.३०

२२ ऑक्टोबर  राजस्थान रॉयल्स वि. सनरायजर्स हैदराबाद             सायं. ७.३०

२३ ऑक्टोबर चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स                      सायं. ७.३०

२४ ऑक्टोबर कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स           दु. ३.३०

किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. सनरायजर्स हैदराबाद                         सायं. ७.३०

२५ ऑक्टोबर  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. चेन्नई सुपर किंग्ज             दु. ३.३०

राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स                                         सायं. ७.३०

२६ ऑक्टोबर  कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब      सायं. ७.३०

२७ ऑक्टोबर  सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स                  सायं. ७.३०

२८ ऑक्टोबर मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु                  सायं. ७.३०

२९ ऑक्टोबर चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाइट रायडर्स       सायं. ७.३०

३० ऑक्टोबर किंग्ज ईलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स            सायं. ७.३०

३१ ऑक्टोबर  दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स                        दु. ३.३०

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. सनरायजर्स हैदराबाद                  सायं. ७.३०

१ नोव्हेंबर    चेन्नई सुपर किंग्ज वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब         दु. ३.३०

कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स                  सायं. ७.३०

२ नोव्हेंबर   दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु           सायं. ७.३०

३ नोव्हेंबर   सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स              सायं. ७.३०

(संकलन : ऋषिकेश बामणे)