Dream11 IPL 2020 UAE MI vs KKR : मुंबई इंडियन्सने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली. पण आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाताच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.

रोहितच्या खेळीबद्दल आणि नेतृत्वकौशल्याबद्दल भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने त्याचं क्रिकबझशी बोलताना कौतुक केलं. “मी नेहमीच म्हणतोय की महेंद्रसिंग धोनीनंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधार हा रोहित शर्माच आहे. सामना आणि खेळ समजून घेण्याची त्याची क्षमता उत्तम आहे. खेळाच्या गरजेनुसार तो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात जे बदल करतो ते एक उत्तम कर्णधारच करू शकतो”, असे सेहवाग म्हणाला.

“कोलकाताविरूद्धच्या सामन्यात नितीश राणा आणि कार्तिक खेळत असताना रोहितच्या जागी दुसऱ्या एखाद्या कर्णधाराने कृणाल पांड्याला गोलंदाजी दिली असती आणि तो निर्णय कदाचित चुकीचा ठरला असता. पण रोहितने त्यावेळी गोलंदाजीसाठी कायरन पोलार्डला आणलं. त्याने अनुभवाच्या बळावर धावगतीवर अंकुश लावला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजासमोर त्याने पोलार्डला गोलंदाजी दिली असती तर ते चुकीचं ठरलं असते. अनेकदा पोलार्डच्यासमोर उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज असताना पोलार्ड महागडा ठरतो पण रोहितने त्याला नितीश राणासमोर गोलंदाजी दिली आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला”, अशा शब्दात सेहवागने रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.