Dream11 IPL 2020 UAE : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला दमदार सुरूवात मिळवून देणारा क्विंटन डी कॉक कोलकाताच्या शिवम मावीचा पहिला बळी ठरला. दुसऱ्याच षटकात तो १ धाव काढून माघारी परतला. पण रोहितशर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी सुरूवात केली.

रोहित शर्माने IPL2020 च्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडू पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. पॅट कमिन्सला कोलकाताने १५.५० कोटींमध्ये विकत घेतले. तो आज पाचवं षटक टाकायला आला. पहिला चेंडू त्याने वाइड टाकला. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर रोहितने उत्तुंग असा षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतरही त्याने पॅट कमिन्सचा जोरदार समाचार घेतला.

पाहा रोहितची फटकेबाजी-

दरम्यान, मुंबईसाठी आणखी एक आनंदाची गोष्टही घडली. कायरन पोलार्डने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळत असलेल्या सामन्यात १५०व्यांदा मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. मुंबईच्या संघाकडून १५० सामने खेळणारा पोलार्ड हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. २०१० साली १० मे ला पोलार्डने मुंबई इंडियन्स संघातून IPL मध्ये पदार्पण केले. चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेत पोलार्डने त्रिनिदाद आणि तोबॅगो संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर त्याला मुंबईने संघात स्थान दिले होते.