सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. २०१४मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता. पण अखेर मुंबईने बुधवारी युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे आणि भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळवला.

मुंबईचा युएईमध्ये हा पहिलावहिला विजय ठरला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हा विजय जोरदार पद्धतीने साजरा केला. मुंबई इंडियन्स दुबईतील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे त्या हॉटेलमध्ये मुंबईची एक टीम रूम आहे. या टीम रूममध्ये सर्व खेळाडू, त्यांच्या पत्नी, मुलं-बाळ तसेच संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफ या साऱ्यांच्याच उपस्थितीत मुंबईच्या पहिल्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवर या सेलिब्रेशनचा व्हिडीओदेखील पोस्ट करण्यात आला.

पाहा व्हिडीओ-

मुंबईने कोलकाताचा केला पराभव

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात १ धाव काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ८० धावा केल्या. ५४ चेंडूंच्या त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्याच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली.

१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिल (७) आणि सुनील नारायण (९) स्वस्तात बाद झाले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज फलंदाज नितीश राणा यांनी कोलकाताचा सावरला आणि सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. पण राहुल चहरने कार्तिकला (३०) पायचीत पकडले. कार्तिकपाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेला नितीश राणादेखील (२४) बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसल (११) आणि इयन मॉर्गन (१६) एकाच षटकात माघारी परतले. पॅट कमिन्सने बुमराहला एकाच षटकात चार षटकार लगावत काही काळ झुंज दिली पण १२ चेंडूत ४ षटकारांसह ३३ धावा करून तो बाद झाला. त्यामुळे मुंबईला ४९ धावांनी विजय मिळवला.