रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे ४ हंगाम विजेतेपदं मिळवली. मुंबईचा अपवाद वगळला तर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये ३ विजेतेपदं मिळवली आहेत. आयपीएलमध्ये यशस्वी कर्णधार म्हणून नाव मिळवण्यासाठी रोहितने रिकी पाँटींगला श्रेय दिलं आहे.

“संघातल्या प्रत्येक खेळाडूकडून छोट्या-छोट्या स्वरुपात योगदान कसं मिळेल याकडे मी पाहत असतो. अर्थात कर्णधार म्हणून माझी कामगिरीही महत्वाची आहे. संघात खेळणारे १० खेळाडू आणि राखीव खेळाडूंशी बोलून तुम्ही संघासाठी अत्यंत महत्वाचे आहात ही भावना सतत जागृत ठेवणं गरजेचं असतं आणि मी ती करतो. प्रत्येकवेळी त्यांच्या डोक्यात काही कल्पना असतील तर मी त्या ऐकतो, त्यात माझे काही विचार त्यांना सांगतो…अशा पद्धतीने माझं काम सुरु असतं. याचं श्रेय मी रिकी पाँटींगला देईन.” India Today Inspritation या कार्यक्रमात रोहित बोलत होता.

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणारा रिकी काही वर्षांपूर्वी मुंबईचा प्रशिक्षक होता. ज्यावेळी तुम्ही कर्णधार असता त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे तुम्हाला कसं हवंय याचा सारखा विचार करुन चालत नाही. तुमच्यासोबत असलेल्या खेळाडूचं मत घेणंही गरजेचं असतं. रिकी पाँटींगने मला ही महत्वाची गोष्ट शिकवली आणि मी ती नेहमी पाळतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबईने आतापर्यंत एक सामना गमावला असून एक सामना जिंकला आहे.