आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगले. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता स्पर्धा युएईत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व संघांना यंदा विजयाची समान संधी आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा युएईमधला रेकॉर्ड फारसा चांगला नाही. याआधी २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईत खेळवण्यात आले होते. ज्यातील सर्व सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पहिल्या सामन्याआधी आयोजित व्हर्चुअल पत्रकार परिषदेत रोहित शर्माने संघाच्या युएईमधील खराब कामगिरीबद्दलच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. “मी त्या गोष्टीचा फारसा बाऊ करत नाही. २०१४ साली आमचा जो संघ होता त्या संघातले फक्त २-३ खेळाडू आता या संघात आहेत. ही गोष्ट खरी आहे की २०१४ साली युएईत आमची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. पण आताचा पूर्ण संघ वेगळा आहे. सहा वर्षांचा काळ लोटला आहे. त्यानंतर मुंबईच्या संघाने नेहमी चांगली कामगिरी केली आहे. युएईत खेळत असताना खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेणं महत्वाचं असणार आहे.”

२०१४ साली युएईत मुंबई इंडियन्सचे ५ सामने खेळले ज्यात त्यांना कोलकाता, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद या पाचही संघांकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र यानंतर स्पर्धा भारतात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपला फॉर्म दाखवत ९ सामन्यांपैकी ७ सामने जिंकत प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी कडवी झुंज दिली होती. त्यामुळे यंदा मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.