आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झाल्यामुळे मुंबईकर सुर्यकुमार यादवची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. प्रतिभा असूनही अद्याप भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आरसीबीबरोबर बुधवारी झालेल्या सामन्यात सुर्यकुमारनं नाबाद ७९ धावांची खेळी केली. या विजयी खेळीनंतर सोशल मीडियावर सुर्यकुमार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यातच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटरवर रोहित शर्माचं सुर्यकुमारबाबतच एक ट्विट पोस्ट केलं आहे. रोहित शर्मानं २०११ मध्ये सुर्यकुमार यादवच्या प्रतिभाबद्दलच एक ट्विट केलं होतं. तेच ट्विट मुंबईनं पुन्हा एकदा शेअर केलं आहे. रोहित शर्माचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय आहे.

९ वर्षांपूर्वी रोहित शर्मानं १० डिसेंबर २०११ रोजी सुर्यकुमारचं कौतुक करणारे एक ट्विट केले होतं. त्यामध्ये त्यानं लिहिले होते की ‘नुकताच चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा झाला. काही प्रतिभाशाली क्रिकेटपटू पुढे येत आहेत. भविष्यात सुर्यकुमार यादव नक्कीच लक्ष वेधून घेईल.’ रोहित शर्माचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे ट्विट सध्या व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांनी असेही म्हटले आहे की रोहितने ९ वर्षांपूर्वीच सुर्यकुमारची प्रतिभा ओळखली होती.

सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या १३ व्या हंगामातील १२ सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सलामीवीर क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानी आहे.