Dream11 IPL 2020 MI vs KXIP: पंजाबविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने ४८ धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईच्या संघाने १९१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावाच करू शकला. राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकूटाने प्रत्येकी २-२ बळी घेत मुंबईला विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळी करणाऱ्या कायरन पोलार्डला सामनावीर घोषित करण्यात आले.

पंजाबसारख्या तुल्यबळ संघाविरूद्ध विजय मिळवल्यानंतर रोहितने आपलं मनोगत व्यक्त केलं. “हा विजय खूप महत्त्वाचा होता. या विजयाने आम्हाला २ गुणही मिळाले. आमचा प्लॅन असा होता की फलंदाजी करताना एका फलंदाजाने खेळपट्टीवर तळ ठोकून पूर्ण २० षटकं खेळून काढायची. मी बाद झाल्यावर पोलार्ड आणि पांड्या या दोघांनी जी धुलाई केली, ती आनंददायी होती. ते दोघे फॉर्ममध्ये असणं पर्वणीच आहे. त्या दोघांमुळे संघाचा समतोल टिकून आहे. गोलंदाजी करतानाही आमच्या खेळाडूंनी प्लॅनप्रमाणेच कामगिरी केली. त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. IPLमध्ये तुम्ही प्रत्येक सामना वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळता त्यामुळे प्रत्येक वेळी तयारी करायला मजा येते”, असं तो म्हणाला.

“बोल्ट आणि पॅटिन्सन हे दोघे उत्तम गोलंदाज आहेत. मी त्यांच्यासोबत या आधी फारसा खेळलो नव्हतो, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं हे माझ्यापुढे आव्हान होतं. पण आता त्यांना मला काय हवं आहे ते नक्की समजलं आहे त्यामुळे आता तेच प्लॅन तयार करतात आणि मला समजावून सांगतात. आता आमची चांगली गट्टी जमली आहे. ५००० IPL धावा करणं हे खूपच आनंददायी आहे, पण माझं लक्ष्य सामना जिंकणं हेच होतं आणि कायम असेल”, असंही रोहित म्हणाला.