स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या यशस्वी जैस्वालला काही महिन्यांपूर्वीच १९ वर्षाखालील भारतीय संघाची दार खुली करण्यात आली. विश्वचषक स्पर्धेत यशस्वीने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर राहून पडेल ते काम करणारा, प्रसंगी मैदानात राहून क्रिकेटचं प्रेम मनात कायम ठेवणाऱ्या यशस्वी जैस्वालची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे. U-19 विश्वचषकात यशस्वीने केलेली फलंदाजी पाहून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला संघात जागा दिली. Test Match Special at the IPL या विशेष पॉडकास्टमध्ये बोलत असताना यशस्वीने क्रिकेटसाठी आपल्याला कराव्या लागलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली.

उत्तर प्रदेशातील एका लहान गावात राहणाऱ्या यशस्वीने क्रिकेटच्या प्रेमापोटी वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. परंतू मायानगरी मुंबईत यशस्वीसाठी सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. क्रिकेटसोबत मुंबईत राहण्यासाठी यशस्वीने लहानपणापासून वाट्टेल ती कामं केली. सुरुवातीच्या काळात यशस्वी एका डेअरीमध्ये काम करायचा. परंतू क्रिकेट खेळून थकल्यामुळे त्याचं कामात लक्ष लागायचं नाही…ज्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. “त्यावेळी मी अक्षरशः त्यांच्या पाया पडलो, की मला इथे राहू द्या. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मग मी माझ्या क्रिकेटच्या प्रशिक्षकांना फोन केला. त्यांनी त्यांच्या घरी माझी राहण्याची सोय केली.” पुढचे ३ महिने मी त्यांच्या घरी राहिलो. यानंतर यशस्वीला प्रशिक्षकांचं घर सोडावं लागलं. यानंतर यशस्वी मुंबईत ज्या क्लबकडून खेळायचा त्या क्लबच्या मैदानातील तंबूत रहायला लागला. परंतू आपल्यासाठी हा काळ अत्यंत चांगला गेल्याचं यशस्वीने सांगितलं.

“तंबूत रहायला लागल्याचा मला खरंतर फायदाच झाला. मी सकाळी लवकर उठायचो…सराव करायचो. कधी फावला वेळ असेल तेव्हा क्लबच्या सामन्यांमध्ये अंपायरिंग, स्कोअरर चं काम करायचो. ज्यामुळे मला थोडे पैसे मिळायचे. काही काळासाठी मी रस्त्यावर खाद्यपदार्थही विकले. परंतू त्यात मला फारसं यश मिळालं नाही. अनेकदा मीच उपाशीपोटी झोपायचो.” यशस्वी आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलत होता. क्लबकडून खेळत असताना निवड समितीमधील सदस्यांची नजर यशस्वीवर पडली. यानंतर त्याला मुंबईच्या रणजी संघात संधी देण्यात आली. वयाच्या १७ व्या वर्षी यशस्वी पहिला रणजी सामना खेळला. २०१९ मध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंड विरुद्ध खेळताना यशस्वीने १५४ चेंडूत २०३ धावा केल्या होत्या. असा पराक्रम करणारा यशस्वी सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वालने पदार्पण केलं, परंतू पहिल्या सामन्यात तो अयशस्वी ठरला. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.