IPL 2020मध्ये शनिवारचा दिवस खूपच रोमांचक ठरला. स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाला कोलकाताविरूद्ध ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वरुण चक्रवर्तीची फिरकीपुढे दिल्ली बेजार झाल्यचं दिसून आलं. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाने १२६ धावांचा बचाव करत १२ धावांनी थरारक विजय मिळवला. ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग आणि इतर फिरकीपटूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव गडगडला. या दोन्ही सामन्यात जिंकणाऱ्या संघाला विजेतेपणासोबतच भावनिक स्पर्श होता. याच संदर्भात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक भावनिक ट्विट केलं.

कोलकाताच्या संघात दमदार खेळी करणाऱ्या नितीश राणाने अर्धशतकानंतर सुरिंदर हे नाव असलेली जर्सी दाखवली. नितीश राणाचे सासरे सुरिंदर मारवाह यांचं काही दिवसांपूर्वी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झालं. त्यामुळे नितीशने आपल्या सासऱ्यांना अर्धशतक समर्पित केलं. दुसऱ्या सामन्यात पंजाबने मयंक अग्रवालच्या जागी मनदीप सिंगला संधी दिली. आदल्या रात्री (शुक्रवारी) मनदीपच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण व्हिडीओ कॉलवरून अंत्यसंस्काराला हजेरी लावल्यानंतर तो संघासाठी मैदानात उतरला. या दोन IPLच्या हिरोंना सचिनने सलाम केला.

“जवळच्या माणासाच्या निधनाने दु:ख होतंच, पण त्यांना शेवटचा निरोप देता आला नाही तर जास्त वाईट वाटतं. मनदीप आणि नितीश या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती इश्वर देवो ही प्रार्थना करतो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे अशा परिस्थितीदेखील संघासाठी मैदानावर उतरल्याबद्दल दोघांना मी सलाम करतो”, असं सचिनने ट्विट करत सांगितलं.

सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही असा प्रसंग घडला होता. १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत तो इंग्लंडला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तो अगदी थोड्या काळासाठी भारतात परतला होता. त्यानंतर तो पुन्हा विश्वचषक स्पर्धेत दाखल झाला आणि त्याने दमदार खेळी करत ती खेळी वडिलांना समर्पित केली होती.