ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा शेन वॉटसनने अखेरीस सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. आगामी हंगामासाठी कर्णधार धोनीने संघात बदल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर शेन वॉटसनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला शेन वॉटसन गेली काही वर्ष लिग क्रिकेटमध्ये सहभागी होत होता.

कारकिर्दीत प्रत्येक पावलावर सहकार्य करणाऱ्या आई-बाबा, बहिणी, पत्नी यांचे वॉटसनने आभार मानले आहेत. आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्याग कधीच विसरु शकणार नसल्याचं वॉटसनने सांगितलं. लॉकडाउनचा काळ, दुखापती यासारख्या अनेक अडचणींना सामोरं जात वॉटसन आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी झाला होता. मात्र ३९ वर्षीय वॉटसनला यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तेराव्या हंगामात वॉटसनने चेन्नईकडून ११ सामन्यांमध्ये १२१.०५ च्या सरासरीने २९९ धावा केल्या. मात्र महत्वाच्या सामन्यांत आपल्या संघाचं आव्हान कायम राखण्यात तो अपयशी ठरला.

२०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ४ वर्ष वॉटसन टी-२० क्रिकेट खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडून ५९ कसोटी, १९० वन-डे आणि ५८ टी-२० सामने वॉटसनने खेळले आहेत.