चेन्नईविरूद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या बळावर बंगळुरूने २० षटकात ४ बाद १६९ धावा ठोकल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरूवातीला फसतो की काय असं चाहत्यांना वाटत होतं. पण विराटने स्वत:च डावाची सूत्र हाती घेत आपला निर्णय सार्थ ठरवला. विराटने धमाकेदार नाबाद ९० धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसनची विकेट खूपच मनोरंजक ठरली.
गेल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा शेन वॉटसन आजच्या सामन्यातदेखील मोठी खेळी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. फाफ डु प्लेसिस स्वस्तात बाद झाल्यावर वॉटसनने शांत आणि संयमी खेळ करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्याने १८ चेंडूत ३ चौकारांसह १४ धावा केल्या. पण विजयासाठी आवश्यक धावगती वाढत जात असल्याने फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरवर हल्ला चढवण्याच्या उद्देशाने वॉटसनने वाकड्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तो चेंडू वॉटसनच्या बॅटवर न लागता थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे चेन्नईच्या डावाचा आधार असलेला वॉटसन स्वस्तात तंबूत परतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंच २ धावांवर त्रिफळाचीत झाला. देवदत्त पडीकल आणि विराटने डाव सावरला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. पडीकल ३३ धावांवर माघारी गेल्यावर पाठोपाठ एबी डीव्हिलियर्सही शून्यावर बाद झाला. फलंदाजीत बढती मिळालेला वॉशिंग्टन सुंदर केवळ १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शिवम दुबे या जोडी डाव संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला. विराटने आपल्या IPL कारकिर्दीतील ३८ वे अर्धशतक ठोकलं. IPL इतिहासात तो सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी पोहोचला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ९० धावा कुटल्या. त्यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेनेही त्याला साथ देत १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला. या दोघांच्या नाबाद ७६ धावांच्या भागीदारीच्या बळावरच बंगळुरूने ४ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 10:55 pm