चेन्नईचा धडाकेबाज सलामीवीर शेन वॉटसन याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. ३९ वर्षीय वॉटसनने किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाला आपल्या निवृत्तीबद्दल सांगितलं. वॉटसनने अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. एक-दोन दिवसांत आपल्या कुटुंबीयांशी चर्चा करून वॉटसन निवृत्तीबाबतचा निर्णय जाहीर करणार आहे, अशी माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं. चेन्नईच्या संघाने जेव्हा २०१८ साली वॉटसनला संघात विकत घेतलं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला होता. २०१८च्या हंगामात चेन्नईने विजेतेपद पटकावलं होतं. त्या विजयात वॉटसनचा सिंहाचा वाटा होता. २०१९च्या अंतिम सामन्यातही वॉटसनने एकट्याने झुंज दिली होती.

CSKकडून खेळताना शेन वॉटससने २०१८मध्ये ५५५ तर २०१९मध्ये ३९८ धावा केल्या होत्या. पण यंदाच्या हंगामात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. IPL 2020मध्ये त्याने ११ डावात केवळ २९९ धावा केल्या. त्यात त्याने पंजाबविरूद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात सर्वोत्तम नाबाद ८३ धावांची खेळी केली. परंतु इतर सामन्यात त्याला चमक दाखवता आली नाही.