केरळचा युवा यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना संजूने बहारदार खेळी करत आपण फॉर्मात असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. चेन्नई आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यात संजूने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पंजाबविरुद्ध सामन्यात राजस्थानला २२४ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. डोंगराएवढं आव्हान राजस्थानने स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.

संजूने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत संजूने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याची ही खेळी पाहून काँग्रेस खासदार शशी थरुर चांगलेच आनंदी झाले आहेत. आपल्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी संजूचं कौतुक करताना तो भारताचा पुढचा धोनी असेल असं म्हटलं आहे.

शशी थरुर यांच्या ट्विटला भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही सूचक उत्तर देत त्याला कोणासारखंही बनण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा संजू म्हणून ओळखला जाईल असं म्हटलं आहे.

सामन्यात एका क्षणी पंजाब सहज जिंकेल असं वाटत असतानाच राहुल तेवतियाने शेल्डन कोट्रेलच्या एका षटकात ५ षटकार ठोकले. तेवतियाच्या या फटकेबाजीमुळे सामना फिरला आणि राजस्थानने सामन्यात बाजी मारली.