IPL कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने (१०१*) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ३ षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला.

शिखर धवनने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. IPL 2020 हंगामातील हे तिसरं शतक ठरलं. बंगळुरूविरूद्ध पंजाबचा कर्णधार राहुलने दमदार शतक ठोकलं होतं. त्यानंतर राजस्थानविरूद्ध पंजाबच्या मयंक अग्रवालने दुसरं शतक लगावलं. IPLच्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिली ३ शतकं भारतीय फलंदाजांनी लगावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या आधी २०११च्या हंगामात पहिली दोन शतकं भारतीय खेळाडूंच्या बॅटमधून निघाली होती. २०११च्या हंगामात पंजाबकडून खेळताना पॉल वल्थाटीने पहिले शतक तर मुंबई इंडियन्सच्या सचिन तेंडुलकरने हंगामातील दुसरं शतक ठोकलं होतं. पण धवनने शतक ठोकत इतिहास रचला.

‘गब्बर’च्या धमाक्यापुढे चेन्नई ‘फेल’

फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन ३६ धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९ चा आकडा गाठून दिला. १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पण शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने ५८ चेंडूत नाबाद १०१ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने ५ चेंडूत २१ धावा करत संघाचा विजय साकारला.