पंजाब विरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला पण शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार अर्धशतक ठोकलं. सुरूवातीला श्रेयस अय्यरसोबत आणि नंतर ऋषभ पंतसोबत भागीदारी करत शिखर धवनने IPLमधलं ४०वं अर्धशतक लगावलं. यंदाच्या हंगामातील हे त्याचं सलग चौथं अर्धशतक ठरलं.

या हंगामातील धवनने केलेल्या अर्धशतकांबद्दल एक रंजक बाब निदर्शनास आली. धवनने प्रत्येक अर्धशतकासाठी आधीच्या खेळीपेक्षा कमी चेंडू खेळले. धवनने हंगामातील पहिलं अर्धशतक मुंबईविरूद्ध ३९ चेंडूमध्ये पूर्ण केलं. तर राजस्थानविरूद्धच्या सामन्यात त्याला दुसऱ्या अर्धशतकासाठी ३० चेंडू खेळावे लागले. त्यानंतर चेन्नईविरूद्ध त्याने शतक ठोकलं. या सामन्यात त्याला अर्धशतक झळकावण्यासाठी २९ चेंडूंचा सामना करावा लागला. तर पंजाबविरूद्ध आजच्या सामन्यात त्याने अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक लगावलं.

शिखर धवन सध्या IPLच्या सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावे ४० अर्धशतकं आहेत. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ४६ अर्धशतकांसह अव्वलस्थानी आहे.