सलामीवीर नितीश राणा आणि अष्टपैलू सुनिल नारायण यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने दिल्लीविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी चौथ्या विकेटसाठी भरधाव शतकी भागीदारी केली.

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत कोलकाताला तीन धक्के दिले होते. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकचा अडसर लवकर दूर झाला होता. पण सलामीला आलेला नितीश राणा आणि मधल्या फळीत संधी मिळालेला सुनिल नारायण या दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. गेल्या काही सामन्यांत फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता न आलेल्या सुनील नारायणने आज मात्र अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. नारायणने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावा केल्या.

पाहा नारायणची झंजावाती खेळी…

सुनील नारायण बाद झाल्यावर नितीश राणाने फटकेबाजी सुरू ठेवली. नितीश राणाने ५३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. संघाला १९४ पर्यंत पोहोचवण्यात राणाने मोलाची भूमिका बजावली. दिल्लीकडून नॉर्ये, स्टॉयनिस आणि रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.