डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि मनिष पांडे यासारखे धडाकेबाज फलंदाज संघात असतानाही सनरायजर्स हैदराबादला १४२ धावांवर रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं. अबुधाबीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IPL 2020मध्ये असं करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला.

सलामीवीर बेअरस्टो आणि वॉर्नर जोडीने डावाची सावध सुरुवात केली. पण कमिन्सने चौथ्याच षटकात बेअरस्टोचा त्रिफळा उडवत कोलकात्याला पहिलं यश मिळवून दिलं. डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण वरुण चक्रवर्तीने जोडी फोडली. त्यामुळे हैदराबादच्या धावगतीला अंकुश लागला. मनिष पांडे आणि वृद्धीमान साहा जोडीने मैदानात तळ ठोकला आणि काहीशी संथ खेळी केली. पण मनीष पांडेने धडाकेबाज खेळी करत अर्धशतक लगावले. ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह त्याने ५१ धावा केल्या. हे मनीष पांडेचे १६वे IPL अर्धशतक ठरले. याचसोबत त्याने माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यांच्या १६ अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

मनीष पांडेकडून हैदराबादला आणखी अपेक्षा होत्या, पण अखेरच्या षटकांमध्ये रसलच्या फुल टॉस चेंडूवर तो फसला आणि सोपा झेल देत माघारी परतला. यानंतर साहा आणि नबी जोडीने फटकेबाजी करत हैदराबादला १४२ धावांचा टप्पा गाठून दिला. कोलकाता संघाकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले.