पंजाब आणि कोलकाता यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाने गेला सामना त्यांच्या फलंदाजीच्या बळावर जिंकला होता, तर पंजाबने त्यांच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे १२६ धावांच्या आव्हानाचा यशस्वी बचाव केला होता. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. डावाच्या सुरूवातीला पंजाबचे गोलंदाज कोलकाताच्या फलंदाजांवर भारी पडले.

कर्णधार लोकेश राहुलने अनपेक्षितपणे पहिलं षटक टाकण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला बोलावलं आणि त्याने नितीश राणाला सामन्याच्या दुसऱ्या आणि राणाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद करवले. त्यानंतर नियमित गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात अप्रतिम स्विंग गोलंदाजीचा नजराणा पेश केला. शमीने आधी राहुल त्रिपाठीला आऊटस्विंग टाकत माघारी पाठवले. त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर शमीने आऊटस्विंग चेंडू टाकत दिनेश कार्तिकलाही बाद केले. कार्तिकने DRSची मदत घेतली होती, पण त्यातही त्याला बाद ठरवण्यात आले.

शमीचे एकाच षटकात दोन बळी-

शमीच्या षटकानंतर कोलकाताची अवस्था ३ बाद १० धावा अशी झाली होती. पण सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार इयॉन मॉर्गन या दोघांनी ८० धावांची धडाकेबाज भागीदारी करत कोलकाताचा डाव सावरला.