पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने तुफान फटकेबाजी करत २० षटकात १९१ धावा केल्या. रोहित शर्माने अत्यंत संयमी खेळी करत ७० धावांची खेळी केली. पण शेवटच्या षटकांमध्ये पांड्या आणि पोलार्ड जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने २० चेंडूत नाबाद ४७ धावा कुटल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या आणि पंजाबला १९२ धावांचे आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने IPLमध्ये अनोखा पराक्रम केला. सामन्यातील पहिला चौकार खेचत त्याने ५,००० IPL धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्यानंतर फिरकीपटूच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना सूर्यकुमार यादव धावचीत झाला. मोहम्मद शमीने फेकलेला थ्रो थेट स्टंपवर लागला आणि सूर्यकुमार यादव १० धावांवर माघारी परतला.

पाहा व्हिडीओ-

रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. संघाची धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करताना इशान किशन झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत २८ धावा केल्या. डावाच्या सुरूवातीला अतिशय संयमी खेळी करणाऱ्या मुंबईच्या ‘हिटमॅन’ने ४० चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादात रोहित शर्मा ७० धावांवर बाद झाला. त्याने ४८ चेंडूच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार खेचले. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या-पोलार्डने तुफान फटकेबाजी केली. पोलार्डने २० चेंडूत ३ चौकार व ४ षटकार मारत नाबाद ४७ धावा केल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ३० धावा जमवल्या.