आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत असले तरीही CSK समोरच्या अडचणी अजून काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. CSK संघातील करोनाची लागण झालेल्या ऋतुराज गायकवाडचा अहवाल अजुन निगेटीव्ह आलेला नसल्यामुळे तो अद्याप क्वारंटाइन झालेला आहे. ऋतुराज गायकवाडसोबतच दीपक चहर व सपोर्ट स्टाफमधील १२ जणांनाही करोनाची लागण झाली होती. परंतू या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात करत पुन्हा एकदा संघासोबत Bio Secure Bubble मध्ये प्रवेश मिळवला आहे.

परंतू गेल्या दोन आठवड्यांपासून क्वारंटाइन होऊनही ऋतुराजचा करोना अहवाल निगेटीव्ही येत नसल्यामुळे CSK संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान ऋतुराजमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीयेत हे CSK संघ व्यवस्थापनाने याआधीच स्पष्ट केलं होतं. डॉक्टरांचं पथक त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांत त्याचा अहवाल निगेटीव्ह येण्याची आशा CSK प्रशासनाला आहे. सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला CSK संघात तिसऱ्या स्थानी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू अद्याप करोना अहवाल निगेटीव्ह आलेला नसल्यामुळे ऋतुराज सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला शारजामधील तयारीचा आढावा