आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेला असणारं ग्लॅमर हा देखील नेहमी एक चर्चेचा विषय असतो. खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी असलेल्या TV Presenter, त्यांची ड्रेसिंग स्टाईल हा स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामात आणखी एक प्रसिद्ध चेहरा आपल्याला पहायला मिळणार आहे. गेल्या दशकभरात Fox Sports वाहिनीसोबत कार्यरत असलेली महिला क्रिडा पत्रकार आणि TV Presenter नेरोली मेडोव्ज यंदा आयपीएलमध्ये काम करताना पहायला मिळणार आहे.

क्रिकेट विश्वचषकापासून अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये ओळखीचा चेहरा झालेल्या नेरोलीला काही दिवसांपूर्वीच आपली नोकरी गमवावी लागली. Cost Cutting चं कारण देत वाहिनीने तिला कामावरुन काढलं. यानंतर अनेकांनी आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नेरोलीला आयपीएलच्या तेराव्या हंगामात काम करण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसांपुर्वी चाहत्यांनीही नेरोलीला IPL मध्ये काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती.

आतापर्यंत आयपीएलमध्ये आपण इशा गुहा, लिसा स्थळेकर, कॅरल एडवर्ड यासारख्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंना काम करताना पाहिलं आहे. यामध्ये आता नेरोली मेडोव्जचं नाव जोडलं जाणार आहे. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएलचं आयोजन हे युएईत करण्यात आलेलं आहे.