IPL कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने (१०१*) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ३ षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. अक्षरने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत सामना दिल्लीच्या आवाक्यात आणला. त्यानंतर २ चेंडूत १ धाव हवी असताना उत्तुंग असा षटकार खेचत संघाला गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवून दिलं. अक्षरने ५ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या.

पाहा अक्षरची धडाकेबाज खेळी-

अक्षरने महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान पटकावलं. IPLच्या इतिहासात शेवटच्या षटकात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्यांच्या यादीत अक्षरने तिसरा क्रमांक पटकावला. धोनीने पंजाबविरूद्ध तर रोहित शर्माने कोलकाताविरूद्ध शेवटच्या षटकात २२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर आज अक्षरने २० धावा ठोकत यादीत नाव कमावलं.

असा रंगला सामना

१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने ६८ धावांची भागीदारी केली. दरम्यानच्या काळात शिखरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. पण श्रेयस अय्यर मोठा फटका खेळताना बाद झाला. पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आणि अलेक्स कॅरीही स्वस्तात बाद झाले. शिखरने आपलं पहिलं शतक साजरं केलं. त्याला अक्षर पटेलने सुरेख साथ देत संघाचा विजय साकारला.

त्याआधी, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. सलामीवीर सॅम करन स्वस्तात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन ३६ धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने ५८ धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९ चा आकडा गाठून दिला.