सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

१९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (२), प्रियम गर्ग (१७), मनिष पांडे (२१) आणि जेसन होल्डर (११) स्वस्तात बाद झाले. केन विल्यमसनने झुंझारपूर्ण अर्धशतक ठोकलं पण तो देखील ६७ धावांवर बाद झाला. सामन्यात १९वे षटक टाकण्यासाठी कगिसो रबाडा आला. त्याने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समद, चौथ्या चेंडूवर राशिद खान आणि पाचव्या चेंडूवर श्रीवत्स गोस्वामी या तिघांना माघारी धाडलं. पण तरीदेखील त्याला हॅटट्रिक मिळाली नाही. याचं कारण म्हणजे पाचवा चेंडू टाकण्याआधी त्याने एक बाऊन्सर चेंडू टाकला होता. तो वाईड ठरवण्यात आला. त्यामुळे रबाडाला तीन सलग अधिकृत चेंडूवर विकेट मिळाल्या, पण हॅटट्रिक मात्र मिळू शकली नाही.

पाहा व्हिडीओ-

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवनने ५० चेंडूत ७८ धावा ठोकल्या. त्याच्यानंतर शिमरॉन हेटमायरनेही २२ चेंडूत ४२ धावा कुटल्या. त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. आता उद्या (१० नोव्हेंबर) अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे.