मुंबईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६५ धावांपर्यंत मजल मारली. देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी डावाला दमदार सुरूवात करून दिली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला चाप लावला. पडीकलने एकाकी झुंज देत ४५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. पण बंगळुरूच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक स्वस्तात झेलबाद झाला. १९ चेंडूत त्याला केवळ १८ धावा करता आल्या. इशान किशनला चांगली सुरूवात मिळाली पण मोठा फटका खेळताना तो २५ धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. धावगतीचा विचार करत सौरभ तिवारीने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हवेत फटका लगावला. पण फटक्याचा अंदाच चुकल्याने चेंडू फारसा लांब जाऊ शकला नाही. त्याचवेळी देवदत्त पडीकलने पुढच्या दिशेने झेप घेत अप्रतिम झेल टिपला. तिवारीने केवळ ५ धावा केल्या.

पाहा तो अप्रतिम झेल…

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये दमदार सुरूवात करत अर्धशतकी (५४) भागीदारी केली. दमदार सुरूवातीनंतर बंगळुरूला आठव्या षटकात पहिला धक्का बसला. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. देवदत्त पडीकलने फटकेबाजी सुरू ठेवत ३० चेंडूत धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं. कर्णधार विराट कोहली ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात डीव्हिलियर्स (१५) झेलबाद झाला.

त्यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊन्सर चेंडू टाकत शिवम दुबेला २ धावांवर माघारी धाडलं. त्याच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकललाही बुमराहने ७४ धावांवर झेलबाद केले. पडीकल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला गळती लागली. मुंबईच्या वेगवान आघाडीने धावगतीवर चाप लावल्याने बंगळुरूला २० षटकात ६ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बुमराहने ३ तर बोल्ट, राहुल चहर आणि पोलार्डने १-१ बळी टिपला.