Dream11 IPL 2020 MI vs RCB: सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या संघाने १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले.

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक १८ धावांवर, इशान किशन २५ धावांवर, सौरभ तिवारी ५ धावांवर आणि कृणाल पांड्या १० धावांवर माघारी परतला. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने सूर्यकुमारला साथ दिली. १९व्या षटकात हार्दिकने ख्रिस मॉरिसला जोरदार षटकार लगावला. तर पुढच्याच चेंडूवर हार्दिक झेलबाद झाला. या कालावधीत हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिसमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. मैदानातून बाहेर जाताना हार्दिक बोट दाखवून RCBच्या खेळाडूंशी काहीतरी वाद घालताना जाताना दिसला.

पाहा नक्की काय घडलं…

विराटही काही काळ काय झालं हे समजून घेण्याच्या प्रयत्नात होता पण तो वादापासून लांबच राहिला. हार्दिक पांड्याने १७ धावा केल्या. पण सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं. त्याने ४३ चेंडूत नाबाद १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७९ धावा केल्या व संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी दमदार सुरूवात केली. जोशुआ फिलिप २४ चेंडूत ३३ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहली (९), डीव्हिलियर्स (१५), शिवम दुबे (२) झटपट बाद झाले. पण खेळपट्टीवर स्थिरावलेल्या देवदत्त पडीकलने दमदार ७४ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि १ षटकार खेचला. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने १६४पर्यंत मजल मारली.