मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीच्या संघाने बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवला. देवदत्त पडीकलने अर्धशतकी खेळी करत बंगळुरूला १५२ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणेने ६० तर शिखर धवनने ५४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याअंती दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. तर, पराभूत बंगळुरूलाही नेट रनरेटमुळे ‘प्ले-ऑफ्स’चं तिकीट मिळालं.

दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे. रहाणेला राजस्थानकडून ट्रेडिंग पद्धतीने दिल्लीच्या संघात देण्यात आले. आधीपासून फलंदाजांची चांगली फौज असलेल्या दिल्लीमध्ये अजिंक्यने १४ पैकी ८ सामने संघाबाहेर बसूनच काढले. पण आज महत्त्वाच्या सामन्यात दिल्लीने रहाणेवर विश्वास दाखवला आणि तो त्याने सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणेने यंदाच्या हंगामातील पहिलं अर्धशतक ठोकलं. याआधी त्याने ५ सामन्यात केवळ ५१ धावा केल्या होत्या, पण आजच्या सामन्यात त्याने ४६ चेंडूत ६० धावा केल्या. यंदाच्या हंगामातील हे अजिंक्यचं पहिलं अर्धशतक ठरलं असलं तरी त्याने मोक्याच्या क्षणी आपली उपयुक्तता सिद्ध केली.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५ षटकारांसह ५० धावा केल्या. तसेच डीव्हिलियर्सने २१ चेंडूत २ षटकारांसह ३५ धावा केल्या. त्यामुळे संघाला १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे यांनी अनुभव पणाला लावत ६५ चेंडूत ८८ धावांची भागीदारी केली. शिखर धवनने ४१ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने ६० धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दणदणीत विजय मिळवला.