हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने संघात तीन बदल केले. केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. तर खलील अहमदला संघाबाहेर करत नदीमला संघात स्थान दिले. हैदराबादने फलंदाजी केलेला प्रयोग पुरेपूर यशस्वी ठरला.

वृद्धिमान साहाने सुरुवातीच्या दोन षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्यानेच दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर प्ले च्या ६ षटकांत तब्बल ७७ धावा कुटल्या. महत्त्वाची बाब म्हणजे यात डेव्हिड वॉर्नरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्याने अवघ्या २५ चेंडूत आपलं अर्धशतक साकारलं. यंदाच्या हंगामात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये अर्धशतक ठोकणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू ठरला. या आधी या हंगामात ही कामगिरी करणं कोणालाही शक्य झालं नाही. स्वत:च्या वाढदिवशी त्याने हा दमदार पराक्रम केला.

हैदराबादच्या संघाकडून खेळताना वॉर्नर-साहा जोडीने अवघ्या ५२ चेंडूत (८.४ षटकांत) शतक गाठले. वॉर्नरने तुफान फटकेबाजी करत होता, पण अश्विनच्या एका चेंडूवर तो झेलबाद झाला. वॉर्नरने ३४ चेंडूत ६६ धावा केल्या. यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.